बीड : सद्या राज्यात आरक्षणावरून वातावरण तापले आहे. त्याची सर्वात जास्त झळ बसली आहे ती म्हणजे बीड जिल्ह्याला. त्यात पंकजा मुंडे यांचा लोकसभेत झालेला पराभव हा पंकजा मुंडे समर्थकांना जिव्हारी लागला आहे. आता अशातच वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्देशून सोशल माध्यमावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.
वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘एकच पर्व ओबीसी सर्व’, ‘जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार’ अशी रील पोस्ट केली होती. संबंदित इन्स्टाग्राम रीलवर देवडी येथील धनंजय झाटे या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुत्व, दुर्भावना वाढवून एकोपा टिकू नये, या उद्देशाने पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली. दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
बीडमध्ये तणाव..
बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या काही तरुणांनी लोकसभेतील पराभवाने निराश होऊन आत्महत्याही केल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण सातत्याने तणावपूर्ण राहिले आहे. परिणामी पोलिसांकडून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे.
पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव
बीड जिल्हा हा गेली अनेक वर्षे पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे एकहाती वर्चस्व दिसून आले आहे. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करुन सर्वांनाच धक्का दिला होता. या विजयामुळे राजकीय वर्तुळात बजरंग सोनवणे यांची ओळख जायंट किलर अशी झाली आहे. दरम्यान हा बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली होती. मात्र, अखेरच्या क्षणी बजरंग सोनावणे यांनी बाजी मारत पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते.