मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात मोठी मुसंडी मारली आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या पारड्यात 17 जागा आल्याने निराशा पदरी पडली आहे. काँग्रेसला 13 जागा जिंकून महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागांवर विजय मिळवला असून त्या पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. महायुतीत भाजपला 9, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. सांगलीतून विशाल पाटील अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.
महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामध्ये मित्रपक्षांचा देखील पाठिंबा होता. आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात चर्चा सुरु झाल्या असून कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच मविआतील तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी 96 जागा या प्रमाणं जागा वाटप होईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मित्रपक्षांनी देखील त्यांची भूमिका जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेला मविआला पाठिंबा देणाऱ्या माकपनं काँग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये माकपनं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. माकपनं राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात तीव्र होत असलेल्या शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
यामध्ये आमदार विनोद निकोले, डॉ. डी.एल.कऱ्हाड, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या राज्यभरातील माकपच्या भरीव योगदानाच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीत माकपला किमान 12 जागा महाविकास आघाडीने द्याव्यात यासाठीचा प्रस्ताव आज माकपच्या वतीने त्यांना देण्यात आला.
माकपनं ‘या’ जागांचा प्रस्ताव दिला..
कळवण, नाशिक (पश्चिम), डहाणू व विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे), दिंडोरी आणि इगतपुरी (नाशिक), सोलापूर (मध्य), माजलगाव (बीड), अकोले (अहमदनगर), किनवट (नांदेड) आणि पाथरी (परभणी) हे विधानसभा मतदार संघ लढविण्याची तयारी माकपने सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. मागील आठवड्यात शरद पवार यांचीही माकपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. लवकरच उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना किती जागा सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मविआ म्हणून लढवण्याची निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आहे.