जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, १२ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर शेकडो वाहनांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तो (छगन भुजबळ) येवल्याहून येऊन भांडण लावेल, दंगली करेल आणि निघून जाईल. पण भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा उलटवणार. तू जेवढे करशील तेवढे मराठे एक होत आहेत, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
आपल्या विरोधात कितीही जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवलीतील सगळा समाज आपला आहे. आपली घडी विस्कळीत होऊ देऊ नका, तो येवल्याहून येऊन भांडण लावेल, दंगली घडवेल आणि निघून जाईल. खेडेगावातील ओबीसी आणि मराठा समाज एक आहे. भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या… तुझा टांगा उलटवणार. तू जेवढे करशील तेवढे मराठे एक होत आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.
तर सरकारला पलटी करू
पुढे बोलताना म्हणाले, आपल्याला संघर्ष करावा लागणार असून अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजासोबत आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे सरकणार नाही. सगेसोयऱ्यांची व्याख्या आमच्या म्हणण्यानुसार घ्या, आणि नंतरच अंमलबजावणी करा. हैदराबादचे गॅझेट, मुंबई गव्हर्मेंटचे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करा, यादीतील ८३ क्रमांकावर कुणबी आणि मराठा एकच आहेत. त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरुस्ती करा, ही आमची मागणी आहे. आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकार पलटले, तर आपल्यासमोर ३ पर्याय
जरांगे पाटील म्हणाले की, सरकार पलटलं, तर आपल्यासमोर तीन पर्याय आहेत. आपण पुन्हा मुंबईला जाऊ. त्यावेळी तुम्ही म्हणाल तेव्हाच मी बाहेर येणार. दुसरा पर्याय म्हणजे त्यांचा पूर्ण टांगा विधानसभेत उलटवायचा, आणि तिसरा पर्याय २८८ जागा लढायच्या का पाडायच्या याचा निर्णय १३ तारखेनंतर घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.