पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व स्कूल व्हॅन यांना फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणी सुविधेसाठी दिवे कार्यालय येथे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत आहे. आरटीओकडून वाहनांची फिटनेस तपासणी, योग्यता प्रमाणपत्र घेतले का? नसेल घेतले तर धोकादायक वाहने रस्त्यावर आणल्यास कठोर कारवाईचा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड (आरटीओ) यांनी दिला आहे. तसेच तत्काळ आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरात आरटीओकडे नोंद असलेल्या स्कूल व्हॅन व बसची संख्या जवळपास सहा हजार ८९५ इतकी आहे. या सर्व स्कूल व्हॅन व बसमधून दिवसाला साधारण चार लाखांच्या पुढे पुढे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. प्रत्येक वर्षी स्कूल व्हॅनला स्कूल बस नियमावलीनुसार योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. अन्यथा आरटीओ प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. नवीन शैक्षणिक वर्षे १५ जूनपासून जिल्ह्यात सर्वच रस्त्यावर स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे.
या शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने संबंधित बस, व्हॅनचे योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत असणे आवश्यक आहे. तरी सर्व शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन, तसेच खासगी स्कूल बस मालक यांनी तत्काळ आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नूतनीकरण करून घ्यावे. त्यासाठी पुणे आरटीओकडून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.