पुणे : पुण्यातील कर्वेनगर येथे एका महिलेची लग्नाचे आमिष दाखवून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मनेकखरे वबिम लादेवी नावाच्या व्यक्तीवर शनिवारी (दि.22) वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (दि.12) नोव्हेंबर रोजी घडला आहे. याबाबत कर्वेनगर परिसरात राहणा-या एका 35 वर्षीय महिलेने पोलीसांना फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाली होती. काही दिवसांनी त्यांचे व्हॉट्सअॅप कॉलवर बोलणे सुरु झाले. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कॅनडाहून तुझ्यासाठी गिफ्ट आणले असल्याचे सांगितले.
कॅनडाहून आणलेले गिफ्ट विमानतळावर पाठविले आहे, पण कस्टम ड्युटीमुळे ते भारतात आणण्यास अडचणी येत असल्याचे सांगून महिलेकडून पैसे मागितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून महिलेने टप्प्याटप्प्याने 6 लाख 75 हजार रुपये पाठवले. काही कालावधीनंतर पैसे संपले असल्याचे सांगितल्यावर आरोपीने महिलेला फोन करायचे बंद केले. ना गिफ्ट मिळाले ना गेलेले पैसे परत मिळाले. त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात तिने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.