छत्रपती संभाजीनगर : राज्यात सद्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे आक्रमक झालेले दिसून येत आहे. आता जरांगे पाटील यांनी काही मागण्या पुढे केल्या आहेत.
जरांगे पाटील म्हणाले कि, आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असूनही आम्हाला ओबीसीतून आरक्षण का दिले जात नाही. सगेसोरऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही आहे. असे अनेक प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले आहेत. राज्यात मराठा समाजासह ब्राह्मण, मारवाडी, लोहार, मुस्लीम समाजातील लोकांच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते आज (23 जून) छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमच्या पाठीत खंजीर खुपसून..
“पाशा पटेल या मुस्लीम समाजाच्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे. सरकारी दरबारी मुस्लीम समाजाचीही कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मु्स्लिमांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायला हवे. हे आरक्षण कसे दिले जात नाही, तेच मी बघतो. तुम्हाला कायद्याने चालायचे आहे ना. 1967 सालानंतर ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्या कोठेच नोंद नाही. तुम्ही यांना कोणत्या आधारावर 16 टक्के आरक्षण दिलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही आरक्षण दिलं कसं?” असा सवाल जरांगे यांनी केला.
मुस्लीम, मारवाडी, ब्राह्मण यांनाही आरक्षण मिळावं ; जरांगे पाटील
“आता हेच म्हणत आहेत की तुम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लावत आहात. ही भूमिका आम्हाला पटत नाही. आम्ही इतके दिवस भाऊ म्हणून वागलो. पण प्रत्येकवेळी तुम्ही आमच्या ताटात औषध कालवायचं काम केलं आहे. पण आम्ही ते सोडून देत राहिलो, तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं. आम्हाला तर आधार आहे. आमच्या सरकारी नोंदींचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लीम, मारवाडी, ब्राह्मण यांनादेखील कायद्याचा आधार आहे. मी ज्यांची नावे घेतली घेतली आहेत, त्यांना आरक्षण घ्यायचे असेल तर घेतील किंवा घेणार नाहीत. पण त्यांच्यात ज्यांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत, त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. लोहार, कुंभार समाजातही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. तुम्ही त्यांच्यावर का अन्याय करत आहात. त्यांनाही आता आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्यावर आता अन्याय होता कामा नये. आता हे सगळं लफडं सोबतच सुरू असेल,” अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी घेतली.