युनूस तांबोळी
शिरुर : शिरुर तालुक्याच्या बेट भागात मृग नक्षञातील पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने व बदललेल्या हवामानाने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केली जात आहे. पाणी साठवण्यासाठी बॅरल, हौद, रांजण, सिंटेक्स टाक्या यामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो. पाणी पिण्याचे असो किंवा वापराचे असो आठवड्यातून किमान एकदा तरी भांडी घासून, पुसून, कोरडे करून घ्यावेत. जेणेकरून डासांच्या मादीने घातलेली अंडी नष्ट होतील. यामुळे घरामध्ये डासांची निर्मिती होणार नाही.
तसेच घराच्या अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करावा. घराच्या टेरेसवर ठेवलेल्या टाकाऊ वस्तू म्हणजेच, कलरचे रिकामे डबे, टायर, मडके, पक्षी यांना पिण्यासाठी ठेवलेले भांडे, गाडगे, भंगार साहित्य या वस्तूंमध्ये देखील पाणी साठवून डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते. म्हणून आपण या वस्तू पालथ्या घालाव्यात किंवा अडोशाच्या ठिकाणी पुन्हा पाणी साठणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्यात. तसेच घरातील फ्रिज च्या पाठीमागील बाजूस पाणी साठते. त्यामध्ये सुद्धा डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया यासारख्या आजाराची डासांची निर्मिती होते. दर आठवड्यातून एक वेळेस सदर भांडे खोलून स्वच्छ घासून घ्यावे , असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र ताप, थंडी, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबण्यामध्ये दुखणे, अंगावर लालसर चट्टे किंवा पुरळ तसेच चिकनगुनियामध्ये वरील लक्षणे दिसून येऊन सोबत संपूर्ण शरीराच्या सांध्या मध्ये तीव्र वेदना होणे, रुग्ण वाकून चालतो आणि दम लागतो. ही लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताची तपासणी करून निदान करावे. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे, आराम करणे, किवी, ड्रॅगन फळ यासारखी फळ खावीत.
डेंग्यू व चिकुनगुनिया हे दोन्ही आजार एकाच डासाच्या मादीमुळे होतात. या डासाच्या अंगावर पांढरे पांढरे ठिपके असतात. म्हणून त्याला टायगर मॉस्किटो असे संबोधले जाते. हा डास दिवसा चावणारा असून त्याच्या गुणगुण करण्याचा आवाज बिलकुल येत नाही. म्हणून त्याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात. सायंकाळनंतर हे रात्रभर आराम करण्यासाठी घरातील लोबणाऱ्या वस्तूंवर व काळ्या वस्तूवर आराम करतात. या आजारामध्ये रुग्णाला लक्षणानुसार उपचार दिला जातो. ही डासाची मादी 21 ते 28 दिवस जगत असून तीन वेळा अंडी घालते एका वेळेला ती साधारण 100 ते 150 अंडी घालते.
पॉझिटिव्ह डासांच्या मादीने व्यक्तीला चावा घेतल्यास हत्तीरोग आजाराची लक्षणे दिसण्यासाठी तब्बल दीड वर्ष एवढा कालावधी लागतो. त्यामुळे डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी वरील उपाययोजना लक्षात घेऊन त्याचा वापर करावा.
डाँ. नामदेव पानगे
प्रभारी वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठे येमाई, शिरुर