करमाळा, (सोलापूर) : विविध विजेवरील मोटारीचे दुकाने फोडून तसेच शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारीतील तांब्याच्या तारा चोरून विल्हेवाट लावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या करमाळा पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी तांब्याच्या तारा विकत घेणाऱ्या व चोरी करणाऱ्या अशा तिघांना अटक केली आहे.
मिराज उर्फ सैफन शिवाजी काळे (वय 25, रा. वायरलेस फाटा, दौंड, ता. दौंड), ऋषिकेश शरद भोसले (रा. कोऱ्हाळे बु. बारामती), सोमनाथ शांतप्पा कोगनुर (रा. शेवाळे प्लाट कुरकुंभ, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 लाख 24 हजार 8०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिव्हेगव्हाण येथील जगदंबा मोटार रिवायडिंग या दुकानाचे शटर शनिवारी (ता.. 09) मध्यरात्री फोडून दुकानातून पाऊणे दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत दुकानदार हरी बबन पाडुळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्घ फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा करमाळा पोलीस तपास करीत असताना पथकातील अजित उबाळे व त्यांचे पथक तपास करीत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणा आधारे माहिती मिळाली की, तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी ही बारामती, दौंड, औरंगाबाद येथील शहरामध्ये कॉपर वायरचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची टोळी कार्यरत आहे. गुन्हे करण्यासाठी यांची टोळी सोलापूर जिल्हयात येते. त्यावरून करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कंदर येथील ईश्वरी हॉटेल येथे एकजण थांबला आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदा ठिकाणी जाऊन बॅग घेवून उभा असलेल्या एकाला चौकशीला घेतले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याच्याजवळील बॅग तपासून पाहिले असता दोन स्कु-ड्रायव्हर, कटर, कटावणी वगैरे संशयित साहित्य मिळून आले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने बारामती, दौंड, औरंगाबाद येथील साथीदार यांच्यासह मिळून मागील काही महिन्यांपासून सोलापूर व इंदापूर, पुणे इत्यादी ठिकाणी वाहनांमध्ये जावून कॉपर वायरचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील कॉपर वायरचे केबल बन्डल व कॉपर वायर, इत्यादी साहित्याची चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, चोरी केलेला माल सोमनाथ शांतप्पा कोगनुर (रा. शेवाळे प्लाट कुरकुंभ ता. दौंड) याला विकल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून 472 किलो वजनाचे तांब्याची तार एकुण 4,24,800 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता करमाळा पोलीस ठाण्यात घडलेले तीन गुन्ह्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
सदरची कामगिरी करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित उबाळे, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, तौफीक काझी, सोमनाथ जगताप, ज्ञानेश्वर घोंगडे, रविराज गटकुळ, गणेश शिंदे, सौदागर ताकभाते तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांनी केली आहे