Savitri Thakur : तुम्ही देशाचे मंत्री असता आणि तुम्हाला एखादा नारा सुध्दा लिहिता येत नसेल, तर किती फजिती होणारी बाब आहे ही. अस घडू शकत का? तर हो अस घडलं आहे. मध्य प्रदेशमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ ही घोषणा चुकीची लिहिली आहे. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटने नंतर विरोधी पक्ष काँग्रेसने मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहे.
मध्य प्रदेशातील धार येथील ब्रह्मा कुंडी येथील सरकारी शाळेमध्ये ‘स्कूल चलो अभियान’ अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धार मतदारसंघाच्या लोकसभा सदस्या सावित्री ठाकूर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सावित्री यांना नुकतेच केंद्र सरकारमध्ये महिला आणि बालविकास राज्यमंत्री करण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये महिला मंत्री व्हाईटबोर्डवर देवनागरी लिपीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा चुकीच्या पद्धतीने लिहिताना दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केके मिश्रा म्हणाले, ‘संवैधानिक पदे भूषवणारे आणि मोठ्या खात्यांची जबाबदारी असलेले लोक, त्यांच्या मातृभाषेतही सक्षम नसतात. ते त्यांची मंत्रालये कशी चालवू शकतात? खर तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.
धार जिल्हा भाजप अध्यक्ष मनोज सोमाणी यांनी आरोप केला की, ‘स्कुल चलो अभियाना’दरम्यान महिला मंत्र्याच्या घाईघाईने झालेल्या चुकीच्या व्हिडिओवरून काँग्रेसने कारण नसताना टीका करत आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून खासदार आणि केंद्रीय मंत्री असूनही सावित्री ठाकूर यांना दोन शब्दही नीट लिहिता येत नाहीत, असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.