जिंती (सोलापूर): तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. मात्र जिंती ते कावळवाडी (ता. करमाळा) रस्त्यावरील रेल्वे बोगद्याची वाट विद्यार्थ्यांसाठी खडतरच बनली आहे. या रस्त्यावर पाणी, चिखल व बोगद्यातील कठड्यांवरील दगड पडत असल्याने, एकविसाव्या शतकातही विद्यार्थ्यांना येथून जीव मुठीत धरून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल शिवसेनेचे (उबाठा) करमाळा उप तालुकाप्रमुख भिवाजी शेजाळ यांनी केला आहे.
जिंती येथील रेल्वे गेट बंद करून रेल्वे प्रशासनाने नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा. म्हणून मागील तीन वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने हा बोगदा नागरिकांसाठी खुला केला. मात्र या बोगद्याचा नागरिकांना वारंवार त्रास होऊ लागला आहे. या बोगद्यात कधी पाणी, चिखल, कधी लहान मोठे दगड पडत आहेत. या रस्त्यावरून शाळेत जाणारी विद्यार्थी रस्त्याच्या एका बाजूने जातात.
दरम्यान, या रेल्वे बोगद्याच्या कठड्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे कधी मोठे दगड तर कधी माती खाली ढासळून रस्त्यावर पडत असते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संबंधित प्रशासनाने सिमेंटची संरक्षण भिंत बांधावी. तसेच दोन्ही बाजूची उंची कमी करावी. अशी मागणी भिवाजी शेजाळ यांनी केली आहे.
प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
बोगद्यात कुठे अचानक तीव्र उतार तर कुठे चढ आहे. त्यामुळे आधीच वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्यात याच बोगद्यात खूप धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना धोकादायकरीत्या जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
– रामभाऊ हाके (संचालक – मकाई सहकारी साखर कारखाना, जिंती)अन्यथा तीव्र आंदोलन करणार
जिंती गावात आठवडे बाजार, बँका, शाळा व सर्व प्रकारची दुकाने असल्याने हे गाव दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जिंतीत दररोज विद्यार्थी व नागरिक जात असतात. मात्र जिंती येथील रेल्वे बोगदा आमच्या मुळावर उठला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे.
– तुषार हाके (सरपंच – कावळवाडी, ता. करमाळा)