पुणे : गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबई येथील मालाडमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन आईस्क्रीम मागवले होते. त्यामध्ये मानवी बोट आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलीसांना तपासात अनेक खुलासे समोर आले आहेत. आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, पुण्यातील यम्मो आईस्क्रीमच्या कारखान्यातील कामगाराचे बोट असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांच्या तपासात लक्षात आले की, पुण्यातील यम्मो आईस्क्रीमच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचेच बोट कदाचित आईस्क्रीममध्ये आले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
ही घटना उघडकीस आल्यानंतर फूट सेफ्टी अॅन्ड स्टॅंडर्ड्स ऑथरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) या पूर्वीच या आईस्क्रीम कंपनीचे लायसन्स रद्द केलं आहे. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी 272, 273, 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला आहे.
दरम्यान, यावर यम्मो आईस्क्रीम कंपनीने उत्तर दिलं आहे. ‘आईस्क्रीमची निर्मिती थर्ट पार्टी कंपनीकडून केली जाते. ते आता थांबवलं आहे. तसेच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत. बाजारात असलेला माल परत घेत आहोत, असंही कंपनीने सांगितलं.