मुंबई : गेले काही दिवस झाले अजित पवार गटामध्ये नाराजीनाटय बघायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना दिलेल्या राज्यसभा उमेदरवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यात आता खासदार होण्याची इच्छा असणारे, पण संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ , हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू पाहात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. छगन भुजबळ आणि शिवसेनेचा आता कोणताही संबंध नाही. छगन भुजबळ आणि शिवसेनेत बोलणी सुरु आहेत, अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले. छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ झाला आहे. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत काही एक तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळ यांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे. ते शिवसेनेत येणार अशा बातम्या उडवून महाराष्ट्रात गोंधळ उडवला जात आहे. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही आणि भेटणारही नाही, अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी सांगितले.
आम्ही गप्प बसणार नाही..
आज आमचा 58 वा वर्धापन दिन आहे. शिवसेना ही बेईमान लोकांना छातीवर घेऊन नाही तर निष्ठावंतांनी शिवसेना इथपर्यंत आणली आहे. भविष्यात तेलुगू देसम पक्षाकडून काही प्रस्ताव आला तर इंडिया आघाडीकडून त्याचा नक्कीच विचार केला जाईल. आम्ही गप्प बसणार नाही, जिथं जिथं संधी मिळेल आम्ही विरोध करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले.
कोणत्याही पक्षात जाणार नाही : छगन भुजबळ
छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तसंच कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.