पुणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला. अपेक्षित कामगिरी करता न आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी खालावलेल्या कामगिरीची जबाबदारी स्वीकारून, आपल्याला सरकारमधून मुक्त करा, अशी विनंती वरिष्ठाना केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे मन वळविण्यात अखेर पक्षश्रेष्ठींना यश आले. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपयशी खेळीने फडणवीस राजीनाम्यावर ठाम होते. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला पण महायुतीसाठी ही एक धोक्याची घंटा आहे..
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या हाराकिरीने महायुतीला धक्का बसला. तसेच घटक पक्षातही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत. तर या अपयशी खेळीमुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, आता एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
लोकसभा निकालाचे चिंतन
लोकसभा निकालात भाजपला त्यांचे अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. महायुतीचा प्रत्येक पक्ष लोकसभा निकालानंतर कुठे कमी पडलो, कुणाची साथ मिळाली नाही. नाराजीची कारणं काय, या सर्वांचा सांगोपांग विचार करत आहे. भाजपमध्ये पण या हाराकिरीचे चिंतन होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली.
भाजपला फायदा नाही
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी युती करुन कोणताही लाभ झाला नाही, हा मुद्दा आता समोर आला. याबद्दल चर्चाही होत आहेत. महायुती करुनही भाजपच्या पदरात काहीच पडले नाही. या दोन्ही पक्षांच्या मतदारांनी भाजपला नाकारल्याचा दावा करण्यात आला आहे. उलट भाजपमुळेच या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा झाल्याचा सूर आळवण्यात आला.
महायुती धोक्यात?
महाराष्ट्रात तीन वर्षांपासून सत्तेत असूनही भाजप आणि महायुतीला लोकसभेत अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. महाविकास आघाडीने मात्र मोठी मजल मारलेली दिसून येत आहे. आता चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढलेली दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठा गड असणारा विदर्भ, मात्र तिथे पक्षाला मोठी हारकिरी सहन करावी लागली. तर इतर क्षेत्रातील हक्काचे मतदार संघ गेल्याने तिथे डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच महायुतीचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे.