जळगाव : पाणीपुरी खाणं ही बहुतेकांच्या आवडीची गोष्ट असते. पण हीच पाणीपुरी खाणं जीवाशी सुद्धा येऊ शकत, असं कुणाच्या ध्यानीमनीही नसेल. अशीच एक घटना घडली आहे. ती म्हणजे जळगावच्या चोपडा गावामध्ये. आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली आहे.
जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव येथील रुग्णांचां समावेश असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला. त्यांच्यावर नजीकच्या अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे कमळगाव येथे आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. त्यापैकी काही जणांनी बाजारातील पाणीपुरी विक्रेत्याकडे जाऊन पाणीपुरीचा खाण्याचा आनंद लुटला. तर काहींनी पाणीपुरी घरी खायला पार्सल नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला. अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, 70 पैकी 30 रुग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे 10 रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेचे आमदार लता सोनवणे यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.