मुंबई: T20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडचा संघ आधीच ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. मात्र, पापुआ न्यू गिनी (पीएनजी) विरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने नवा विक्रम रचला. फर्ग्युसनने टी-20 विश्वचषकातील सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत एकही धाव दिली नाही.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पापुआ न्यू गिनीविरुद्ध नाणेफेक जिंकली. प्रथम मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पाचवे षटक टाकायला आलेल्या लॉकी फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. फर्ग्युसनने पीएनजीच्या असद वालाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचे पहिले षटक विकेट मेडन होते. सातवे षटक टाकायला आलेल्या फर्ग्युसनने या षटकात एकही धाव सोडली नाही. फर्ग्युसनने दोन षटकांत एकही धाव न देता एक विकेट आपल्या नावावर केली होती.
डावातील 12वे षटक फर्ग्युसनचे तिसरे षटक होते. त्याने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पीएनजीच्या चार्ल्स अमिनीला बाद केले. या षटकातही फर्ग्युसनने एकही धाव दिली नाही. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने चाड सोपरला बाद केले. तिसरी विकेट घेतली. हे षटकही विकेट मेडन होते. फर्ग्युसनची चार षटकांनंतरची आकडेवारी 4-4-0-3 अशी होती.
विश्वचषकातील सर्वात किफायतशीर स्पेल
फर्ग्युसनने या शानदार स्पेलमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता पुरुषांच्या T20 विश्वचषकात सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजीचा विक्रम त्याच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या टीम साऊथीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. साऊथीने याच विश्वचषकात युगांडाविरुद्ध चार धावांत तीन बळी घेतले होते.
यासह लॉकी फर्ग्युसन आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे. याआधी कॅनडाच्या साद बिन जफरने 2021 साली पनामाविरुद्ध चार षटकांत एकही धाव न देता दोन विकेट घेत विक्रम केला होता.
पीएनजी ७८ धावांत सर्वबाद
प्रथम फलंदाजी करताना पीएनजी संघ 19.4 षटकात 78 धावांत सर्वबाद झाला. संघाकडून चार्ल्स अमिनीने सर्वाधिक 17 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन बळी घेतले. बोल्ट, साऊथी आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. मिचेल सँटनरला एक विकेट मिळाली. न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यासोबतचे गट सामने गमावून आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. संघाने युगांडाविरुद्धचा सामना 9 गडी राखून जिंकला.