जालना : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलेले दिसून येत आहे. नुकताच मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी एक महिन्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची गॅरंटी द्या, अशी मागणी करत लक्ष्मण हाके, वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत.
गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या उपोषणाला राज्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत आहे. लक्ष्मण हाके यांनी आता पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, उपोषणकर्ते त्यांची प्रकृती बिघडली आहे. आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. गेल्या 5 दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. ओबीसी समजााच्या न्याय व हक्कासाठी आपलं उपोषण आहे, असे लक्ष्मण हाके म्हणत आहेत.
गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे आणि अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली असून, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा विनंती करण्यात आली. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत, आपलं उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे.
मुंडे बंधु-भगिनींची उपोषस्थळी
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंब वाढत आहे. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही सोमवारी रात्री उपोषणस्थळी भेट दिली आणि आपली भूमिका मांडली. माझ्या भावांच्या उपोषणातील मागण्यांचा सरकारने विचार करावा, आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे समजावून सांगावं, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. तसेच , उपोषणकर्त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसह सरकारसमोर मांडणार असल्याचं धनंजय मुडेंनी यावेळी म्हटलं आहे.