पुणे : शहरातील आकाश निरभ्र होत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (दि. १७) वडगावशेरी येथे सर्वांत जास्त ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, शहरात हलक्या सरी पडल्या. गेले काही दिवस अवकाळी पाऊस तसेच मान्सून आल्यानंतर ढगाळ हवामान झाले होते. त्यामुळे कमाल तापमानात घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. मात्र, त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहिल्यामुळे कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे.
सोमवारी मगरपट्टा येथे २५ अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क ३४.९, पाषाण व हडपसर ३४.८ तर शिवाजीनगर येथे ३४.३ अंश सेल्सिअस तापमान होते. किमान तापमानातही वाढ होऊन ते २३.२ अंश सेल्सिअसवर गेले. शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कोरेगाव पार्क येथे १, तर शिवाजीनगर येथे ०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. आसपासच्या परिसरात सरी पडल्या. शहरात येत्या १८ ते २३ जूनदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.