मुंबई : शिवसेना ( उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना भाजपवर कडाडून टीका केली आहे. राउत म्हणाले कि, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं आहे. मुघलांनंतर भाजपने केलेलं हे आक्रमण सर्वांत मोठं होतं. आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्यांनी स्वत:ला आरशात पहावं, असा टोला देखील राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
दरम्यान, शिवसेना ( उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. वायकर हे आधी शिवसेनेत होते. ३-४ वेळा बीएमसीमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. मंत्रीही झाले. उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्तीय होते. पण तेच वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरून पळाले. पण आम्ही घाबरलो नाही. जेल, कारवाई आम्ही कशालाच घाबरलो नाही, शिवसेनेतेच थांबलो. वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला अशा शब्दात राऊत यांनी वायकरांवर निशाना साधला आहे.
जिथे ठाकरे आहेत तिथेच खरी शिवसेना
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून त्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचं बांद्रा इथे शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं होतं. त्याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
हा सगळा एक हास्यास्पद प्रकार असल्याचे राउत म्हणाले. 58 वर्षांपूर्वी हिंदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे. तेव्हापासून माझ्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत. तो अजूनही कोणी खाली ठेवला नाही. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, तुरूंगवासही भोगला आहे. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवलं.
जत आता कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वत:ला एकदा आरशात बघाव, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. बाळासाहेबांची शिवसेना कुठे होते, याचा त्यांनी विचार करावा. पैशांनी मतं विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणं म्हणजे याला काही जनाधार म्हणत नाहीत. आणि आपला पक्ष जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत, असे देखील राऊत यांनी सुनावले.