पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स असलेली इन्स्टाग्राम स्टार १५ जूनपासून घरामधून गायब झाली आहे. धक्कदायक बाब म्हणजे तिने घरातच सुसाईड नोट लिहून ठेवत घरातील एकाही व्यक्तीला काहीही न सांगता निघून गेली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयूरी चैतन्य मोडक-पवार (वय-२६, रा. सदाशिव पेठ) असे बेपत्ता झालेल्या इन्स्टाग्राम स्टारचे नाव आहे. मयूरी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून ती घरी परतलीच नाही.
याप्रकरणी तिचे काका मंगल दिलीप पवार (वय ४०) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून मयुरीचा शोध सुरु आहे.
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरी पवार ही सोशल मिडीया इन्स्टाग्राम स्टार आहे. तिला सोशल मिडियावर ‘माऊ’ या नावाने ओळखले जाते. तिला वडील नसून ती आईसोबत पुण्यातील सदाशिव पेठेत राहते. तिने तिच्या सोशल मीडिया करियरची सुरुवात ‘टिक टॉक’वरुन सुरू केली होती. ‘टिक टॉक’वर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिचे लाखो फॉलोअर्स तयार झाले होते.
मात्र, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातली. त्यानंतर, ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने ‘दुर्गा ग्रुप’ या नावाने संस्था स्थापन केलेली असून याद्वारे ती कपड्यांचा व्यवसाय करते. पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.