लोणी काळभोर, (पुणे) : वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस दलातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलेल्या 6 निरीक्षकांचा समावेश आहे. गृह विभागाने याबाबत नुकतेच आदेश काढले आहेत.
यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पवन चौधरी, विकास बडवे, रणजीतसिंग परदेशी, स्वप्नील लोखंडे व श्रीकांत इंगवले या सहाजणांचा समावेश आहे. सेवा कार्यकाळानुसार सहायक पोलीस निरीक्षक पदाहून पोलीस निरीक्षक पदावर या ६ जणांची पदोन्नती करण्यात आली आहे. पोलिस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलिस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाल्याने वरील सर्वच अधिकाऱ्यांवर लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे २०१०च्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत पोलिस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते गडचिरोली येथे रुजू झाले. नक्षली भागात काम केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून २०१४ मध्ये पुणे येथे रुजू झाले. पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन, बारामती परिसरातील वडगाव निंबाळकर, सातारा जिल्ह्यातील फलटण, रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी काम केले आहे. एक कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.”
पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे २०१० च्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत पोलिस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते सलग तीन वर्ष गडचिरोली येथे रुजू झाले होते. २०१४ मध्ये सांगली शहर पोलीस ठाणे, कासेगाव, सांगली जिल्हा व पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यात २ वर्ष कर्तव्य बजावले. सध्या रायगड जिल्ह्यातील मसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वाढत्या चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी व वाढते गुन्हे कमी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
पोलीस निरीक्षक विकास बडवे हे २०११ च्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत पोलिस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते गडचिरोली येथे रुजू झाले. नक्षली भागात काम केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून २०१४ मध्ये पुणे येथे रुजू झाले. त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी काम केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी रुजू झाले आहेत.
पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी हे २०१० च्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत पोलिस खात्यात भरती झाले होते. नाशिक येथे प्रशिक्षण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलीस ठाण्यात रुजू झाले. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस ठाण्यातील लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. त्यानंतर पालघर, मीरा भाईंदर येथून महाराष्ट्र सायबर या ठिकाणी पदोन्नती झाली आहे.
पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे हे २०१० च्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत पोलिस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ ते २०१४ गडचिरोली येथे रुजू झाले होते. २०१४ ते २०१९ साली सातारा शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, २०१९ ते २०२३ ला पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील लोणी काळभोर व यवत पोलीस ठाणे, तसेच धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले आहे. सध्या मुंबई येथे पदोन्नती झाली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे सप्टेंबर २०१० मध्ये पोलिस खात्यात रुजू झाले. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड पोलीस ठाण्यात ३ वर्ष प्रथम कर्तव्य बजावले. पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील लोणावळा शहर, लोणी काळभोर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन पोलीस चौकी, कोल्हापूर जिल्ह्यातील तळे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात सेवा बजावली. लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात एक कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सध्या कर्तव्य बजावत आहेत. सध्या मुंबई येथे पदोन्नती झाली आहे.