आंबेठाण : खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुलींसोबत येथे येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. ही घटना १६ जून रोजी घडली.
वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करतात. आजही या ठिकाणी जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करत आहेत.
मात्र काल १६ जून ला एक तरुण मुलगा आणि मुलगी या ठिकाणी आले. आणि त्या दोघांनी त्यांचे अश्लील चाळे करण्यास सुरु केले. यावरून कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्याने त्यांना हटकले. त्याच रागातून त्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढंच नाही तर संध्याकाळी पुन्हा मित्रांना घेवून येत जबर मारहाण केली.
या घटनेत साधक विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्या सोबत असलेला एक विध्यार्थी देखील जखमी झाला आहे. या साधकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश नवले आणि त्यांचे सहकारी करीत आहे.