इंदापूर : यम्मो कंपनीच्या ब्रँडला बाजारात बदनाम करण्याचं मोठं षड्यंत्र रचलं जात असल्याची शंका इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीचे संचालक सचिन जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मुंबईतील मालाडमध्ये एका महिलेला आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर डेअरी प्रशासनाने तात्काळ पत्रकार परिषद घेत भुमिका मांडली.
संचालक सचिन जाधव म्हणाले, यम्मोने आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केलेला आहे. इंदापुरातील फॉर्च्युन डेअरी कंपनी सील केलेले नाही तर आमचा परवाना तात्पुरता स्थगित केला आहे. कंपनी बाबत झालेल्या तक्रारीबाबत पोलीस तपास सुरु आहे. यंत्रणेला तपासात आम्ही सहकार्य करत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, एफएसआय कडून फॉर्च्युन डेअरी ही दूध भुकटी, बटर उत्पादन करण्यासाठी परवानगी घेऊन ते पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती सचिन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.