लोणी काळभोर : पुणे शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून, धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरातील, लेन नंबर तीनमध्ये गुरुवारी (ता.14) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.
बाबू राममुर्ती बोयर (वय २९) व सुरेश राममुर्ती बोयर (वय २४ दोघेही रा. लोणी स्टेशनध्याजवळ, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नावे आहेत. त्यांच्याकडून 19 महागडे लॅपटॉप, 63 अँड्रॉइड हँडसेटसह 5 डिजिटल घड्याळ असा, सुमारे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू बोयर व सुरेश हे दोघे नात्याने सख्खे सखे भाऊ आहेत. या दोघा भावांनी घरात घुसून चोरी केल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस आरोपींच्या मार्गावर होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली, की दोन्ही आरोपी हे कदमवाकवस्ती येथे राहत आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या .
आरोपींच्या घराची झडती केली असता, घरामध्ये 19 महागडे लॅपटॉप, 63 अँड्रॉइड हँडसेटसह 5 डिजिटल घड्याळे असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या नागरिकांचे मोबाईल व लॅपटॉप असतील त्यांनी त्याच्या पावत्या व वर्णन सांगून घेऊन जावे असे आवाहन विश्रांतवाडी पोलिसांनी केले आहे.
मोठ्या रकमेसह सोने असल्याची चर्चा
कदमवाकवस्ती येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बॅगांमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. कचऱ्याच्या डब्यामध्ये सोने पाहिले असल्याची नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. त्यामुळे रोख रक्कम व सोने गेले कुठे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.