मंगळवेढा (सोलापूर) : मारापूर मंडळमधील एका शेतकऱ्याची जमीन बक्षीसपत्र करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा मंडलाधिकारी चंद्रकांत इंगोले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकला असून, त्याच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी जमीन बक्षीसपत्र करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता.
तेव्हा मंडल अधिकारी इंगोले यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. पाच हजार रुपये देताना संत दामाजी साखर कारखाना रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने इंगोले यांना रंगेहाथ पकडून पोलीस ठाण्यात हजर केले आहे.