पुणे : अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणे याने निलेश लंके यांचा सत्कार केला. या भेटीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पाठोपाठ आता अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील निलेश लकेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, निलेश लंके ज्यांना भेटले ते कोण होते. हे सगळ्यांना माहिती होतं, त्याची कारणे शोधली पाहिजेत. काही दिवसापूर्वी पार्थ पवारांनी गजा मारणे यांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं. सर्वांना ही व्यक्ती कोण आहे, ते माहीत होतं. परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच बारामती निवडणूक पराभवाबाबत आम्ही आत्मपरीक्षण करु, विचारमंथन करु. येणाऱ्या निवडणुकीत अस काही होणार नाही, काळजी करु नका. लंके ज्यांना भेटले ते कोण होते, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या, आज मी सर्वांना धनयवाद देते, मला राज्यसभा उमेदवारी दिली. सर्वांनी मान्यता दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. आज खासदार म्हणून सर्वांचं पाठबळ आहे. राज्यसभा खासदार म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल आभार मानते. कार्यकर्त्यांचा उत्साह हा बळ देणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांत अनेक समस्या जाणवल्या, बारामती सारखा इतर तालुक्याचा विकास करायचा आहे. मला मंत्रीपद दिलं तर काम करायला आवडेल, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.