इंदापूर : NEET (२०२३-२४) प्रवेश परीक्षा रद्द करून पुन्हा परिक्षा घेण्यात यावी, पुनर्परीक्षा तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास झालेल्या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून फेरनिकाल लावण्यात यावा, अशी मागणी गुरुकुल विद्यामंदिरचे अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ यांनी केली आहे.
गुरुवारी (दि.13) NEET (२०२३-२४) प्रवेश परीक्षेत झालेल्या घोटाळ्या संदर्भात इंदापूर तहसील कार्यालयावर विद्यार्थी व पालक यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना लक्ष्मण हरणावळ म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील वैद्यकीय प्रवेश करिता NEET प्रवेश परीक्षा रविवार ५ मे २०२४ रोजी घेण्यात आली. आजपर्यंतच्या इतिहासात चालू वर्षी सर्वाधिक विद्यार्थी NEET प्रवेश परीक्षेकरीता प्रविष्ठ झाले होते. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी डॉक्टर होऊन समाजाची सेवा करू इच्छितात; परंतु त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला योग्य तो न्याय मिळत नसल्याचे निर्दशनास येत आहे.
ते पुढे म्हणाले, आजपर्यतच्या इतिहासात NEET प्रवेश परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण फक्त ५ ते ६ विद्यार्थ्यांना मिळतात. परंतु, यंदा जवळपास ६८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळालेले आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार ५ ते ६ परीक्षा केंद्रावरती पेपर फुटीचा प्रकार आढल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर पेपर फुटीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. काही विद्यार्थ्यांना पेपर वेळेवरती न दिल्यामुळे गुण वाढवून दिले. या प्रकारचे स्वतंत्र स्पष्टीकरण न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंदापूर नागरी समितीचे अध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे, शशिकांत शेंडे तसेच साक्षी व्यवहारे या विद्यार्थ्यींनीने आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सुहास मोरे, कुणाल काळे, संजय सोनवणे, माजी नगरसेवक सुनील अरगडे, माऊली वाघमोडे, नवनाथ रूपनवर, माजी सरपंच बापू पोळ, वसंत फलफले, सतीश शिंदे, प्रशांत गिड्डे, विश्वास हुलगे, विकास घुगे, नजीर शिकिलकर, बाळासाहेब महानवर, विठ्ठल सावंत, संभाजी सूर्यवंशी, संतोष घोडके, रविंद्र सातव आदी उपस्थित होते.