पुणे : बारामतीमध्ये काही कार्यकर्त्यांनी बाबारामतीचा आमदार बदला अशी हाक दिली असतानाच, आता इंदापूर मध्येही असाच सूर ऐकायला मिळत आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. शरद पवार सध्या विविध भागांना भेटी देत आहेत. स्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे? हे सुद्धा जाणून घेत आहेत. बारामती, पुरंदर नंतर आता शरद पवार हे इंदापूर तालुक्यात आहेत. इंदापूरमधील निरवांगी या गावात शरद पवार सध्या उपस्थित आहेत. दरम्यान स्थानिकांनी शरद पवार यांच्यापुढे एक मागणी पुढे केली आहे. शरद पवारसाहेब आमचा आमदार बदल.., आप्पासाहेब जगदाळे यांना आमदार करा. कारण इंदापूरचा आमदार बदलल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी हाक स्थानिकांनी शरद पवारांकडे दिली आहे.
नीरा नदीवर बंधारा करावा, 22 गावांचा बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवावा, जनावरांसाठी चारा छावणी द्यावी, दुधाचे अनुदान थकलं आहे, ते मिळावं. आम्ही दूध आणि डाळिंब यावरच अवलंबून आहोत. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जानेवारीमध्ये घोषित केलं असून सुद्धा ते मिळालेलं नाही, असं म्हणत स्थानिकांनी पवारांसमोर आपल्या विविध समस्या मांडल्या.
यावेळी शरद पवारांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. शरद पवार स्थानिकांशी बोलताना म्हणाले कि सरकारला अनुदान द्यावेच लागेल. नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नाहीतर 4-6 महिने थांबा. कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार, असं शरद पवार म्हणाले.