लोणी काळभोर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाली आहे. आठवले यांची सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल लोणी स्टेशन (ता. हवेली) चौकात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
लोणी स्टेशन चौकात सोमवारी (ता. १०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यानंतर ‘रामदास आठवले तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है’,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’,‘रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’,‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी रिपाईचे पुणे जिल्हा संघटक विशाल शेलार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख-राजु गायकवाड, हवेली तालुका युवक अध्यक्ष अभिजीत पाचकुडवे, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सदस्य दिपक आढाळे, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे, अजय धेंडे, अतुल बनसोडे, पप्पू गायकवाड, रोहित उपरगुठे, मल्हार आगलावे, रमेश गायकवाड, सचिन धेंडे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दिपक आढाळे म्हणाले, रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले असे नेते आहेत, ज्यांना सलग तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद तसेच त्यांना चांगले खाते मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना विशाल शेलार म्हणाले, आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवलेंनी काम केले आहे. पक्षातर्फे त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे.
दरम्यान, रामदास आठवले आरपीआयचे अध्यक्ष आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मोदी यांच्या या आधीच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा त्यांचा मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली होती.
यावेळी मात्र त्यांना बढती मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे रामदास आठवले यांच्याकडे एकही खासदार नाही. अशा स्थितीतही त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. हिच खरी त्यांची ताकद असल्याचे बोलले जात आहे.