लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील ऐतिहासिक माधवराव पेशवे वाड्याची भिंत पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता गुप्त धनासाठी पाडल्याचा आरोप सारिका सिद्धार्थ कांबळे यांनी केला होता. मात्र सारिका कांबळे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. असा दावा श्री चिंतामणी गणपती मंदिराचे पुजारी मंगलमुर्ती आगलावे व अजय आगलावे यांनी केला आहे. तसेच सारिका कांबळे यांच्या विरूद्ध लवकरच अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहोत. असे या दोन बंधूंनी सांगितले आहे.
पुढे बोलताना आगलावे बंधू म्हणाले की, अशी कोणतीही पेशवे कालीन भिंत आम्ही पाडलेली नाही. मुळात अशी कोणतीही पेशवे कालीन भिंत आमच्या जागा मिळकतीमध्ये नव्हती व नाही. सदरील जागा मिळकत ही आमच्या स्वतःच्या मालकीची व ताबेवहिवाटीची आहे. याबद्दलचे कायदेशीर कागदपत्रे आमच्याजवळ उपलब्ध आहेत. त्याअनुषंगाने सारिका कांबळे यांनी पुरातत्व विभागाकडे केलेल्या तक्रारी खोटया व बेकायदेशीर आहे. तसेच असे बिनबुडाचे धादांत खोटे आरोप करून आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहेत व बदनामी करू पाहत आहेत.
दरम्यान, अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे श्री चिंतामणी गणपती मंदिर आहे. महाराष्ट्र शासनाने या गावाला तीर्थक्षेत्र ‘ब’चा दर्जा दिलेला आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. या गावामध्ये माधवराव पेशवे हे त्यांच्या कुटुंबासह काही काळ वास्तव्यास होते. तसेच मुळामुठा नदी किनारी रमाबाई पेशवे यांचे समाधीस्थळसुद्धा आहे. थेऊर गावामध्ये पेशव्यांनी श्री चिंतामणी मंदिर व पेशवेवाड्याची उभारणी केलेली आहे.
सारिका कांबळे यांनी पुरातत्व विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, श्री चिंतामणी गणपती मंदिराचे पुजारी मंगलमुर्ती विनायक आगलावे, अजय विश्वास आगलावे या दोघांनी गुप्त धनाच्या लालसेपोटी 11 मे 2024 रोजी रात्रीच्या वेळेस तांत्रिक विधी, जादू टोणा, लिंबू मिरची, हळदी कुंकु अशा गोष्टींचा वापर करून पेशवेकालीन भिंत पाडली आहे. सदर इसमांना खूप मोठ्या प्रमाणात गुप्तधन मिळाले असल्याची शक्यता सारिका कांबळे यांनी त्यांच्या तक्रारीत व्यक्त केली आहे.