BJP : नरेंद्र मोदी यांनी रविवारी दि. 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी अमित शाह, नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? ही एकच चर्चा रंगू लागली आहे.
जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जानेवारीत पूर्ण होता परंतु लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान जे. पी. नड्डा सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नवा चेहरा मिळणार हे आता स्पष्टच आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काही नाव सुद्धा चर्चेत येऊ लागले आहेत. त्यामध्ये शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मनोहरलाल खट्टर यांच्या नावांची चर्चा सुरु होती. मात्र त्यानंही मंत्रीपद मिळाले आहे
विनोद तावडेंचे नाव चर्चेत
या पदासाठी सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. सोबतच माजी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना संधी मिळू शकते असं बोललं जातंय. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे असून राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभेचे तिकीट तावडे यांना मिळाले नव्हते. त्यावरून राजकीय वर्तुळात त्यांची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर विनोद तावडे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा विश्वास संपादन केला. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी बनले.
याशिवाय इतर नेत्यांचे सुद्धा नाव चर्चेत असल्याचे समजते. त्यामध्ये, उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. शर्मा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यासोबतच अजून एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सुनील बन्सल. हे ओडिशा, बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अल्पावधीतच भाजप हायकमांडचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे या पदासाठी बन्सल यांचे नाव देखील चर्चेत आहे.