नवी दिल्ली : एनडीए सरकारमध्ये मंत्रिपदांचे विभाजन होण्यापूर्वीच एका मंत्र्याने पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार सुरेश गोपी यांना मोदी सरकारमधील मंत्रीपद सोडायचे आहे. त्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपले म्हणणे मांडले आहे. सुरेश गोपी यांनी रविवारी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर ते म्हणाले की, मला मंत्री राहायचे नाही. त्यांना मंत्रिपदावरून मुक्त करावे, अशी त्यांची इच्छा आहे.
सुरेश गोपी यांनी मनोरमा न्यूजशी बोलताना मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मला आशा आहे की मला केंद्रीय मंत्रिमंडळातून मुक्त केले जाईल. मला माझे चित्रपट पूर्ण करायचे आहेत. केंद्रीय नेतृत्वाला निर्णय घेऊ द्या. खासदार म्हणून मी त्रिशूरमध्ये माझ्या क्षमतेनुसार कामगिरी करेन. मला मंत्रिपद नको, असे मी म्हटले होते.
गोपींच्या माध्यमातून केरळमध्ये उघडले खाते
केरळमध्ये सुरेश गोपी हे एकमेव भाजप खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना ‘ट्रोल’ करण्यात आले होते. ‘ॲक्शन हिरो’ सुरेश गोपी यांनी केरळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्रिशूरची जागा जिंकून भाजपसाठी इतिहास रचला आहे. केरळमध्ये भाजपच्या अनेक दशकांच्या संघर्षाचे फळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिळाले. शेवटी भारतीय जनता पक्षाने सुरेश गोपी यांच्या माध्यमातून येथे आपले खाते उघडले.
यापूर्वी राज्यसभा खासदार राहिलेल्या गोपी यांनी विजयानंतरही त्यांच्या राजकीय डावात चढ-उतार पाहिले. केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्यास त्यांनी सुरुवातीला अनास्था दाखवली होती. दिल्लीतील एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहून ते दोन दिवसांपूर्वी केरळला परतले होते. मात्र, रविवारी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला आणि त्यांना तातडीने दिल्लीला पोहोचण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सुरेश गोपी यांनी रविवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी गोपी यांना 2016 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. त्यांचा वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ 2022 पर्यंत होता.