नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहता मंत्रीपद देतानाच खातेवाटप देखील निश्चित झाले आहे. आता फक्त ते जाहीर कधी केले जाते, याची उत्सुकता आहे. मोदींनी पुढील १०० दिवसांच्या कामकाजाची योजना आखली आहे. तसेच नव्या सरकारला येत्या काही दिवसांत आपला पूर्ण अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन नवे मंत्री कामाला लागलेले असतील. सहकारी पक्षांना देण्यात आलेली मंत्री पदे पाहता अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र यांसह इतरही अनेक महत्त्वाची खाती भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जेडीयूच्या वाट्याला रेल्वे, तर टीडीपीला माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय मिळू शकते. चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा पदभार जाण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणते मंत्रीपद मिळेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.