मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सीतारामन यांच्याशिवाय माजी राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल आणि कर्नाटकमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या महिला नेत्यांमध्ये 37 वर्षीय रक्षा निखिल खडसे यांच्या नावाचाही समावेश आहे. या मंत्रिमंडळातील त्या सर्वात तरुण महिला मंत्री असल्याने त्यांचीही चर्चा होत आहे. याशिवाय सावित्री ठाकूर आणि निमुबेन बंभानिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या रक्षा खडसे या दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री आहेत. त्या 37 वर्षांच्या आहेत. त्यांनी बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे ही मिळवली आहे. त्यांच्या आधी राम मोहन नायडू (वय 36 वर्ष) हे सर्वात तरुण मंत्री आहेत. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन रक्षा खडसे संसदेत पोहोचल्या आहेत. खडसे या मूळच्य मध्य प्रदेशातील खेडिया जिल्ह्यातील आहेत. 2010 साली कोथडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2012 पर्यंत त्या या पदावर होत्या. यानंतर त्या जळगाव जिल्हा परिषदेत निवडून आल्या. 2012 ते 2014 पर्यंत त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले.
रक्षा खडसे यांनी 2014 साली पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांचा 3,18,608 मतांनी पराभव केला. वयाच्या 26 व्या वर्षी हीना गावित यांच्यासोबत त्या 16व्या लोकसभेच्या सर्वात तरुण खासदार बनल्या. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उल्हास पाटील यांचा 3,35,882 मतांनी पराभव केला. 2024 मध्ये तिसऱ्यांदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) श्रीराम पाटील यांचा 2,72,183 मतांनी पराभव केला.