उरुळी कांचन, (पुणे) : गोठ्यातील विद्युत प्लगचा करंट लागून एका 62 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन परिसरात घडली आहे. रविवारी (ता. 10) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाटील वस्ती, खेडेकर मळा परिसरात हि घटना घडली आहे.
नागनाथ विश्वनाथ मुद्गुडे (वय -62, उरुळी कांचन, मूळ रा. कळदेव निंबाळा, ता. उमरगा, जिल्हा धाराशिव) असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद पंडित कांचन, (वय- 25, रा. पाटील वस्ती, खेडेकर, मळा, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ मुद्गुडे हे मुळचे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. कामानिमित्त उरुळी कांचन येथील एका शेतात वास्तव्यास होते. यावेळी शेतातील सर्व कामे करून उदरनिर्वाह करीत होते.
रोजच्या प्रमाणे रविवारी (ता. 09) साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्यातील दुध काढण्याच्या मशीन जवळील विद्युत प्लगचा करंट लागून तो जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आले व कोणतीही हालचाल करीत नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस महिला पोलीस हवालदार भुजबळ करीत आहेत.