जम्मू कश्मीर : जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत कोसळली. या गोळीबारत बस चालकाला गोळी लागली आहे. या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 30-35 जण जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेक भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधात शोधमोहीम सुरू केली आहे. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही ५५ सीटर बस होती आणि ही बस शिवखोडीहून कटराकडे जात होती. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे घाबरलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. ज्या दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला, ते सर्व राजौरी, पूंछ आणि रियासी भागात लपून बसले असून, सुरक्षा दलाने त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.