Politics : काही दिवसांपूर्वी उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी म्हणाले कि उत्तमरावांनी बारामतीमध्ये यावं. अजितदादांच्या फॉर्ममध्ये 55 गायींचा गोठा आहे. या गायींची देखभाल करायला एका “उत्तम” माणसाची गरज आहे. त्यासाठी एका माणसाची जागा रिक्त आहे, असा टोला मिटकरींनी उत्तम जानकरांना लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता.
काय म्हणाले मिटकरी?
उत्तमरावांनी बारामती मध्ये यावं. अजितदादांच्या या फॉर्म मध्ये 55 गायींचा मुक्त गोठा आहे. सध्या गायीची देखभाल करायला एका “उत्तम” माणसाची जागा रिक्त आहे. तुमची इच्छा असेल तर सालगडी म्हणुन “उत्तम” काम करता येईल. तसेही तुम्हला तुतारीवाले गोठा साफ करायलाच ठेवणार होते. इथं लायकीचं काम मिळतं. अशी टीका मिटकरींनी उत्तम जानकर यांच्यावर केली आहे.
उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले होते?
अजितदादा कधीच नेता नव्हते आणि होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गायी, बंगलोरी, होस्टेन अशा गायीचे चांगले पैदास केंद्र सुरु करावे यात ते यशस्वी होतील, असे उत्तम जानकर म्हणाले होते. त्यांचा हा गोठा देशपातळीवर चांगला होईल. दादांना राजकारणातले काही सुद्धा कळत नसले तरी ते धंद्यात हुशार आहेत. त्या गोठ्याला भेट देण्यासाठी मी सुद्धा जाईन, अशा शब्दात उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. आता त्यांच्या याच टीकेवर मिटकरींनी त्यांचा समाचार घेतला आहे.