मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापन होणार आहे. रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी एनडीए सरकारमधील काही मंत्र्यांना सुध्दा शपथ दिली जाईल. या मंत्र्यांनामध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी पहिल्या खासदाराचे नाव निश्चित झाले आहे. अजितदादा गटाचे प्रफुल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे. दिल्लीत पार पडलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली आहे. उद्या राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या सोहळ्यात प्रफुल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेतील. आता त्यांना कोणते खाते देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. प्रफुल पटेल यांनी यापूर्वी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती.
एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रत्येक चार खासदारांमागे एक मंत्रिपद असे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. भाजप महत्त्वाची मंत्रीपदे मात्र स्वत:कडे ठेवू शकते. भाजपकडे अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय ही खाती कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला कोणते खाते येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराला मोठी जबाबदारी मिळू शकते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.