पुणे : शहरातील ताडीवाला रस्ता येथील दयाराम तुळशीराम राजगुरू सांस्कृतिक भवनात लग्न समारंभ सुरू असताना अचानक छताचा काही भाग कोसळला. यामध्ये पाच महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवार ७ जून रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड भागात राहणारे शंकर पाटणेकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा या भवनात शुक्रवार ७ जून रोजी आयोजित केला होता. लग्नाचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक हॉलच्या छताचा काही भाग कोसळला. या घटनेत हॉलमध्ये बसलेल्या वऱ्हाडी मंडळीपैकी पाच महिला जखमी झाल्या आहेत. हॉलमध्ये सिमेंटच्या तुकड्यांचा खच पडला आहे.
त्यानंतर जखमी झालेल्या पाहुण्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर जमखीमधील दोघींना सिटी स्कॅन करण्यास सांगितल्याचे तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.