पुणे : मोबाईलच्या दुकानातील कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून दुकानातून नामांकित कंपनीचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला विश्रामबाग पोलिसांनी ७२ तासांत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० लाख ५६ हजार ९९२ रुपयांचे आयफोन, वनप्लस, सॅमसंग कंपनीचे महागडे फोन जप्त करण्यात आले आहेत.
झबीउल्लाह नबीउल्लाह खान (वय-२८रा. आझाद नगर, घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (वय-२० रा. खारदांडा, खारवेस्ट, मुंबई), कमलेश विश्वास मोरे (वय-२० रा. रहाटणी फाटा, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोबाईल दुकानातील तिघांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून महागडे मोबाईल चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध सुरु केला. आरोपी मुंबई व पुणे प्रवास करत असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता.
दरम्यान, आरोपी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करुन ७२ तासात गुन्हा उघड केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.