पाचगणी : पाचगणी परिसरात गुरुवारी (6 जून) मध्यरात्री वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर- पाचगणी मुख्य रस्त्यावर महाकाय वृक्ष पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे हॉटेलच्या छताचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना रात्री घडल्याने कसलीही दुर्घटना घडली नाही.
पाचगणी -महाबळेश्वर मुख्य मार्गावर पारशी पॉईट नजीक असलेल्या हॉटेल रेनफॉरेस्ट समोरील महाकाय वृक्ष काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुख्य मार्गावर कोसळला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खंडीत झाली होती. हा महाकाय वृक्ष पडल्याने विजेच्या तीन पोलचे नुकसान होऊन तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला होता.
पोलादपूर – सुरुर राज्य मार्गावर झाड पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. हॉटेल रेनफॉरेस्टचे मालक राजेंद्र पार्टे यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी वाहतूक संजीवन स्कूल मार्गे वळवून वाहतूक सुरळीत केली. हे महाकाय झाड पालिका कर्मचारी सुर्यकांत कासुर्डे, बाबू झाडे, शाहनवाज क्षिरसागर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन कटर व जेसीबीच्या साह्याने हटवल्यानंतर मुख्य मार्गावरील वाहतूक सकाळी अकरा वाजता सुरुळीत झाली.