उरुळी कांचन, (पुणे) : आलिशान मोटारीतून बेकायदा देशी-विदेशी बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करीत चारचाकी गाडीसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उरूळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोड गुरुवारी (ता. 6) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि कारवाई केली आहे.
वैभव म्हस्कु कुंजीर (वय 25, रा. वळती ता. हवेली) अशी कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शरद भानुदास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस गस्त घालीत असताना मध्यरात्री एक गाडी संशयित रीत्या आढळून आली. गाडी थांबवून गाडीची पाहणी केली असता गाडीत देशी-विदेशी कंपनीची दारू आढळून आली. यावेळी अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीच्या आतील दारूचा मुद्देमाल तपासला असता त्यात साडेतीन हजारांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा 3 लाख 53 हजार 305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वैभव कुंजीर याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार भुजबळ करीत आहेत.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन व परिसरात सध्या छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारूची वाहतूक होत आहे. मागील पाच दिवसात उरुळी कांचन पोलिसांनी सोरतापवाडी हद्दीतहि बेकायदा दारू व रिक्षासह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यातच गुरुवारी मध्यरात्री आलिशान गाडीतून साडेतीन हजारांची दारू व साडेतीन लाखांची चारचाकी गाडीसह दारू जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे उरुळी कांचन पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली असून या दोन्ही घटनेत पोलिसांनी रिक्षा व चारचाकी गाडीसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.