वाघोली : ग्रामीण भागापासून शहरी भागाला जोडणारा वर्दळीचा रस्ता मार्ग म्हणून कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोलवडी-साष्टे मार्गे मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक पुढे हडपसर शहराकडे हा रस्ता जातो. परंतु हा रस्ता पूर्णपणे अरुंद असल्याने येथे दोन चारचाकी वाहने बसणे अवघड होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.
अनेकांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या रस्त्यावर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे जाणारी प्रवासी वाहने ही बंद केली असून रस्त्यात पीएमपीएल बसला या रस्त्यावर चालताना अडथळा येत असल्याने बससेवा ही बंद अवस्थेत असल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर संबंधित रस्ते बांधकाम खात्याने रुंदीकरण करावे असे रस्त्याची पाहणी करताना कोलवडी-साष्टे गावचे सरपंच विनायक गायकवाड यांनी सांगितले.
कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्याची पाहणी कोलवडी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी येऊन केली. यावेळी कोलवडी-साष्टे गावचे सरपंच विनायक गायकवाड, उपसरपंच रमेश मदने, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गायकवाड, माजी उपसरपंच विकास कांचन, उद्योजक रवींद्र गायकवाड, उद्योजक नानासाहेब मुरकुटे, उद्योजक किरण उंद्रे, पुरुषोत्तम गायकवाड, अभिजित गुप्ता आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच गायकवाड म्हणाले, कोलवडी-मांजरी रस्त्याची समस्या ही गेली दहा वर्षांपासून अशाच अवस्थेत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे शासन व संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करताना दिसते. कोलवडी गाव महानगर पालिकेच्या शेजारी असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आम्ही कोलवडी ग्रामपंचायतीचे निवेदन सबंधित बांधकाम खाते, स्थानिक विधानसभा लोकप्रतिनिधी, लोकसभा लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, बांधकाम मंत्री यांना देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
या रस्ता मार्गाने प्रवास करणारे नागरिक वाहन चालक वैतागले असून जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहे. त्यामुळे कोलवडी-मांजरी रस्त्याचे रुंदीकरण त्वरित व्हावेत, यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.
यावेळी कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश मदने म्हणाले, कोलवडी गाव ग्रामीणकडून शहरीकरणाकडे जात असल्याने लोकवस्ती झपाट्याने वाढून अनेक समस्या निर्माण होत आहे. यामध्ये महत्वाची समस्या ही रस्त्याची असून याच रस्त्याचे रुंदीकरण त्वरित झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही आता गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरलो असून यापुढे रस्त्याचे रुंदीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम विभाग व आमदार, खासदार, बांधकाम मंत्री, आदी लोकप्रतिनिधी यांना पत्र व्यवहार करून पाठवपुरावा करणार आहोत.