पुणे : कल्याणीनगर परिसरात शनिवारी (दि.01) रात्री नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पुणे पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षकाने पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आता त्या पोलीस अधिका-याची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या माहितीला वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दुजोरा दिला आहे.
पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यादरम्यान कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु होती. त्यावेळी एका मोटारीतून सणसवाडीचे तरुण निघाले होते. पोलिसांनी कागदपत्रे नसल्याने त्या मोटारचालकाला दंड केला. त्यानंतर नाकाबंदीतील कर्मचारी तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने (पीएसआयने) तरुणाची कानउघाडणी केली आणि त्याला आपले पाय चेपायला सांगितले.
आपल्यावर कारवाई होऊ नये या भीतीमुळे त्या तरुणाने पोलीस अधिका-याचे पाय चेपून दिले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या पीएसआची बदली करण्यात आली आहे.
यावेळी वाहतुक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार म्हणाले, नाकाबंदीवेळेस तरुणावर कारवाई करताना तो सोडून देण्यासाठी विनंती करत होता. त्यातुन त्याने पोलीस अधिका-याचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडीओ ची सत्यता पडण्यात आली आहे. त्यात पीएसआयने पायाची मसाज करण्यास सांगितल्याचे दिसत नाही. तो तरुण पाय धरत होता, असे दिसते. तरुणावर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. त्यामुळे पीएसआयची बदली करण्यात आली आहे.