उरुळी कांचन, (ता. पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान परिसरात सुरु असलेल्या दारू अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकत ८०० रुपयांची तयार दारू जप्त केली आहे. ही कारवाई बाजार तळ येथे घराच्या आडोशाला असलेल्या बोळीमध्ये बुधवारी (ता. ०५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय प्रकाश पिठे (वय २८, रा. बाजारतळ, महादेव मंदिराशेजारी, उरूळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विशाल सुरेश मारे (वय – ३२) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पिठे हा बाजार मैदान परिसरातील एका बोळात एक तरुणाला दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता त्याठिकाणी ८०० रुपये किमतीची ८ लिटर तयार दारू आढळून आली. याप्रकरणी पीठे याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार होले करीत आहेत.