पिंपरी : पुण्यासह इतर शहरामध्ये दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न असे 90 गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये निगडी परिसरातील सोन्याचे दुकान फोडल्याच्या गुन्ह्यासह तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या धोनोरी येथील सराफ व्यावसायिकाला अटक केली आहे.
विकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय-35 रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. तर अब्दुला ताहीरबक्ष शेख (वय-58 रा. पोरवाल रोड, धानोरी, लोहगाव) असे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराचे नाव आहे. 24 मे रोजी रात्री निगडी प्राधिकरणातील श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून 30 तोळे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदी आणि 18 हजार रुपये रोख रक्कम, डिव्हीआर चोरुन नेले होते. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळ व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तापासून गुन्हेगाराने गुन्हा करतेवेळी लाल रंगाची श्रेवोलेट एंजॉय गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले. गाडीचा शोध घेण्यासाठी शहरातील आणि पुणे शहरातील सरकारी व खासगी असे एकूण 250 ते 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडी हडपसर भागात असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीची माहिती घेतली असता तो कुख्यात गुन्हेगार असून नेहमी शस्त्र बाळगतो तसेच यापूर्वी त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने सावधगिरी बाळगून आरोपीचा तपास सुरु केला. दरम्यान, आरोपी घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरात घुसून आरोपीला बळाचा वापर करुन ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीची चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांसह निगडी येथील ज्वेलर्शचे दुकान फोडल्याचे तसेच बिबवेवाडी येथे बंद फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे, तर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली.
सोनाराला अटक
आरोपी कल्याणीने त्याच्या हिस्स्याचे सोन्याचे दागिने धानोरी येथील सोनाराला विकल्याची माहिती पोलीस पथकाला दिली. त्यानुसार पथकाने सोनार अब्दुल्ला शेख याला अटक करुन त्याच्याकडून 100 ग्रॅम सोन्याची लगड, 8 किलो 300 ग्रॅम वजनाची चांदीची वीट जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी, घरफोडीचे साहित्य, दोन तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.