नवी दिल्ली : देशात काल मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता येत्या शनिवारी (दि. 8) जून रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
दिल्लीत आज एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयु प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपंक्षाशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. 543 जागांपैकी भाजप 240 तर कॉंग्रेस 99 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 292 तर इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालावरुन देशात पुढील सरकार हे आघाडीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार स्थापनेबाबत आज एनडीएची बैठक होणार आहे