गेले दोन दिवस अज्ञात ड्रोन दररोज रात्री फिरताना दिसत असल्याने त्या परिसरातही भीतीचे वातावरण आहे. शिंदवणे येथील काही तरुणांनी व नागरिकांनी रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घातली. पोलिसांना फोन करून माहिती दिली, मात्र पोलीस थिरकले नाहीत.
लाल, हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये होत्या. बराच काळ हे दोन ड्रोन शिंदवणे येथील परिसरात तरंगत असल्याचे छायाचित्रण काही नागरिकांनी केले. काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाला. हे ड्रोन कोणाचे आहेत, कशासाठी ते उडविले जात आहेत. याची ना पोलिसांना माहिती, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले आहे.
दरम्यान, अचानक ड्रोन दिसत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
ड्रोन मुळे निर्माण झालेल्या अफवा तसेच नागरीकांमधील भितीचे वातावरण यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांकडून विशेष तज्ञाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. तसेच जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली होती. मात्र महिती देऊनही पोलीस येत नसल्याने नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांना लक्ष ठेवण्याच्या सूचना द्याव्यात
उरुळी कांचन व परिसरातील भागात भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी दररोज गस्त घालण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रकारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी टिळेकरवाडी व शिंदवणे येथील नागरिकांनी केली आहे.
शिंदवणे येथे रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास दोन ड्रोन दिसून येत होते. यावेळी मोबाईलमधून व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांना ११२ वरती फोन करून माहिती दिली. दोन तास पोलिसांची वाट पहिली, मात्र पोलीस आले नाहीत.
गणेश शितोळे, नागरिक, शिंदवणे, ता. हवेली