पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी आणि पीएच. डी. प्रवेशासाठी येत्या १८ जून रोजी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. नेट परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार असून सकाळी ९.३० ते १२.३० या पहिल्या सत्रात, तर दुपारी ३ ते ६ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.
एनटीएच्या परिपत्रकानुसार, १८ जून रोजी पेन आणि पेपर पद्धतीने नेट परीक्षा घेतली जाईल. परीक्षेच्या तारखेसह एनटीएने परीक्षा शहर सूचना स्लिप प्रसिद्ध करण्याबाबतची माहितीदेखील जाहीर केली आहे. त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी म्हणजेच ८ जून रोजी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा सिटी स्लिपद्वारे, उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळवू शकतात. त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची तयारी करू शकतात.
त्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या होम पेजवर क्लिक करावे लागेल. आता विद्यार्थ्यांना लॉगिन तपशील (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) टाकावे लागतील. यानंतर परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थी ही सिटी स्लिप डाऊनलोड करू शकतात.