हैदराबाद : देशातील सर्वाधिक व्यस्त महानगरांपैकी शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हैदराबाद आजपर्यंत तेलंगण व आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी होते. मात्र आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार, २ जून २०२४ पासून हैदराबाद केवळ तेलंगण राज्याची राजधानी असेल. २०१४ साली आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्याने तेलंगण या वेगळ्या राज्याची निर्मिती झाली. विभाजनावेळी आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही राज्यांसाठी पुढील १० वर्षे संयुक्त राजधानी म्हणून हैदराबादला मान्यता दिली होती. २ जून २०१४ रोजी तेलंगण राज्याची निर्मिती झाली, तेव्हा या कायद्यानुसार हैदराबादला पुढील १० वर्षांसाठी तेलंगण राज्य व आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी ठरवण्यात आले होते. हा कालावधी २ जून २०२४ रोजी संपुष्टात आल्याने यापुढे हैदराबाद केवळ तेलंगणची राजधानी असेल. तर आंध्र प्रदेशसाठी नवीन राजधानीची निर्मिती करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०१४ साली संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक पारित झाले होते. यानंतर २ जून २०१४ ला तेलंगण राज्याची स्थापना झाली. अनेक दशकांपासून तेलंगण राज्याची मागणी करण्यात येत होती. २० जूननंतर हैदराबादमधील लेक व्ह्यू या सरकारी गेस्ट हाऊससारख्या इमारती ताब्यात घेण्याचे निर्देश गत महिन्यात तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.