पाचगणी, (सातारा) : पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरण्यासाठी येणारे रहिवासी, पर्यटक व नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 3 लाख 52 हजार रुपये किमतीचे 22 मोबाईल फोन तांत्रिक पद्धतीने शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. अशी माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल फोन मागील काही दिवसांपासून गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक, पोलीस अंमलदार यांना गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या.
पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन तांत्रिक मदत घेऊन कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील परिसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्ह्यातून शोध घेऊन 3 लाख 52 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 22 मोबाईल फोनचा शोध गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेतला.
दरम्यान, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
सदरची कामगिरी उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे व अमोल जगताप यांनी केली आहे.